पेण, वडखळमध्ये गुजरातच्या कांद्याने केली घुसखोरी; पीक उशिरा आल्याची संधी साधून ग्राहकांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे अलिबागचा कांदा सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हवामानामुळे हे पीक उशिरा आले. हीच संधी साधून अलिबाग, पेण, वडखळमध्ये गुजरातच्या कांद्याने घुसखोरी केली आहे. काही दुकानदार गुजरातचा कांदा चक्क अलिबागच्या नावाखाली खपवून विकत असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, अलिबागचा पांढरा कांदा पुढील आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार असून त्यापूर्वीच त्याचे मार्केट गुजरातच्या कांद्याने खाल्ल्याने स्थानिक विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पावसाने मुबकाम वाढवल्यामुळे अलिबागमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वेळापत्रकच कोलमडले. कांद्याची लागवड पंधरा दिवस उशिरा झाली. त्यामुळे माळी तयार करणे, वाळवण, प्रतवारी ही कामे उशिरा करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा व परिसरामधील अंदाजे ३१६ हेक्टर जमिनीमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याची लागवड केली. पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने प्रत्यक्ष काढणीच्या कामालादेखील उशीर झाला. आता तीन ते चार दिवसांतच अलिबागचा प्रसिद्ध कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे.

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाले असून इतर ठिकाणी होणाऱ्या कांद्यापेक्षा तो वेगळा आहे. अन्य ठिकाणी पिकणारा कांदा आहे. हा तिखट असतो, पण अलिबागचा कांदा तुलनेने कमी तिखट आहे.

अलिबागचा कांदा मार्केटमध्ये येण्यास तब्बल एक महिना उशीर झाला. त्याचा फायदा गुजरातच्या कांद्याने घेतला आणि अलिबागच्या कांद्याचे मार्केटच खाऊन टाकले. जिल्ह्यात आलेले पर्यटक अलिबागचा कांदा समजून गुजरातचा कांदा खरेदी करीत आहेत. फक्त पैसे कमवण्याच्या नावाखाली काही दुकानदार अलिबागचा सांगून गुजरातचा कांदा विकत असल्याचे दिसून आले आहे.

प्रतिमाळ दोनशे ते तीनशे रुपये
अलिबागचा कांदा हा किलोप्रमाणे विकला जात नाही. छोटा, मध्यम व मोठा अशा तीन पद्धतीने त्याच्या माळा तयार केल्या जातात. या माळा दोनशे ते तीनशे रुपयेप्रमाणे विकण्यात येतात. गुजरातचा कांदाही साधारण अशाच दराने विकला जात आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याचे नाव खराब होत असल्याचे पांढऱ्या कांद्याचे उत्पादक विनय मोकल यांनी सांगितले.