
सामना ऑनलाईन । बडोदा
गुजरातच्या बडोदामध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या मोठ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या भावाला दोन्ही किडन्या दान करण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या आत्महत्येचा काहीच उपयोग झाला नाही. कारण त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने भावाला किडन्या दान करण्यात आल्या नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैतिक कुमार तांडेल असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो एका आभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा मोठा भाऊ कनिष किडनी विकाराने त्रस्त होता. त्यामुळेच भावाला दोन्ही किडन्या दान करण्यासाठी त्याने आत्महत्या केली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्याच्या हॉस्टेलमधील रुमची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील मिळाली. यामध्ये नैतिकने मोठ्या भावाला किडनी दान करण्यासाठी आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. तसेच त्याच्या किडन्या भावाला दान करण्यात आल्या तर शरीरातील इतर अवयव हे गरजू माणसांना दान करण्यात यावे असं म्हटलं आहे. नैतिकच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याच्या नातेवाईकांनी जिल्ह्यातील एका रुग्णालयात त्याचा मृतदेह अवयव प्रत्यारोपणासाठी नेला. मात्र नैतिकचा मृतदेह हा रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्यामुळे अवयव प्रत्यारोपण करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.
























































