>> अनिल हर्डीकर
‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी नायकाच्या शोधात असताना दिग्दर्शक हेमा मालिनी यांचा शोध थांबला तो ‘फौजी’ या मालिकेतील लक्षवेधी चेहऱयापाशी. त्या तरुणाचा चेहरा काही असामान्य देखणा नव्हता, पण त्या चेहऱयावर वेगळाच उत्साह दिसत होता.आत्मविश्वासाचे तेज होते ते आणि या नायकाची दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी पहिली भेट झाली.
तो नायक म्हणजे शाहरुख खान!
मा मालिनी ही हिंदी चित्रपटसृष्टीतली यशस्वी अभिनेत्री. तिने मादक दिसण्यासाठी तोकडे कपडे परिधान केले नाहीत, अंगप्रदर्शन केले नाही. ती नृत्यनिपुण होतीच आणि आजही नृत्यावर तिचे प्रेम अबाधित आहे. मीरा, महालक्ष्मी, रामायण, दुर्गा, सावित्री, द्रौपदी, राधाकृष्ण, यशोदाकृष्ण, गीतगोविंद अशा नृत्यनाटिका तिने सादर केल्या आहेत.
सुमारे 150 हून अधिक चित्रपटांतून नायिकेच्या प्रमुख भूमिका, 12 चित्रपटांतून पाहुणी कलाकार आणि 10 मालिकांतून अभिनय केलेली हेमा लोकसभेची सदस्य आहे. आजही अनेक जाहिरातींतून हेमा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱया एका विद्यालयाची ती ब्राण्ड आम्बेसडर आहे.अंधांसाठी चालवल्या जाणाऱया व्हिजन 20-20 या संघटनेचे कामही ती करते.
अभिनेत्री म्हणून यशस्वी आणि प्रस्थापित झाल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळण्याचा मोह तिला झाला. आव्हानांना सामोरं जाणं हा तिचा स्वभाव होताच. तिच्या नात्यातील माणसांना सोबत घेऊन चित्रपट निर्मितीसोबत तिने दिग्दर्शन करण्याचं ठरवलं. हेमा ग्लॅमरचं जग मागे टाकून परिवर्तनाचं उत्साहाने स्वागत करायला सज्ज झाली. ग्लॅमर, सुपर स्टारपद, बॉक्स ऑफिसवरच्या आकडय़ांच्या बेडय़ामध्ये अडकलेलं यश या बेगडी झगमगाटापासून दूर झाल्यामुळे ती आता मनमुक्त साहस करायला मोकळी होती. तिने चित्रपटाची सर्व तयारी केली. मात्र मनासारखा नायक तिला मिळत नव्हता. हैदराबादला तिचा नृत्याचा कार्पाम ठरला होता. त्यासाठी ती निघाली असताना तिने नित्यनेमाप्रमाणे गुरुमा इंदिरा यांच्या आशीर्वादासाठी फोन केला. गुरुमा इंदिरांनी चौकशी केली व विचारलं, “चित्रपटाचं काम कुठवर आलं?” हेमा म्हणाली, “नायकाच्या शोधात आहे.”
गुरुमा इंदिरा म्हणाल्या, “काही काळजी करू नकोस तुला चांगला हीरो अगदी लवकरच मिळणार आहे आणि अगदीच लवकरच तो फार मोठा स्टार झालेला असेल.”
झालं! हैदराबादचा कार्पाम आटोपून हेमा मुंबईला परतली. सवयीनुसार तिने टीव्ही लावला. हा चॅनेल, तो चॅनेल असा रिमोटशी खेळ होऊ लागला. अचानक ‘फौजी’ नावाची मालिका चालू असलेल्या चॅनेलवर हेमाचा रिमोट स्थिरावला. तिथे तिला एक लक्षवेधी चेहरा दिसला. त्या तरुणाचा चेहरा काही असामान्य देखणा नव्हता, पण त्या चेहऱयावर वेगळाच उत्साह दिसत होता.आत्मविश्वासाचे तेज होते. हेमाने ताबडतोब आपल्या ऑफिसमधल्या माणसांना त्या नटाचं नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं.
हेमाच्या सहाय्यकांनी ते काम झटपट केलं. नाव शाहरुख खान, वास्तव्य दिल्ली. त्याचा फोन नंबरसुद्धा मिळाला. त्या फोनवर हेमाच्या मावसबहीण प्रभाने फोन लावला. फोन दुसऱया तिसऱया कुणी नाही तर चक्क स्वत शाहरुखने उचलला. पण हा फोन हेमा मालिनीच्या ऑफिसमधून आलाय यावर त्याचा विश्वास बसेना. त्याला वाटलं कुणीतरी त्याची चेष्टा करतंय. त्याने प्रभाला उडवून लावलं. मग प्रभाने हेमा मालिनीचा फोन नंबर त्याला दिला आणि म्हणाली, “तूच फोन कर आणि खात्री करून घे.” शाहरुखने हेमा मालिनीला फोन लावला.
दोन दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमाच्या घरी चाचणीसाठी दाखल झाला. हेमाला त्याची अभिनयशैली आवडलेली होती. छोटय़ा पडद्यावरचा हा नट मोठय़ा पडद्यावर कसा दिसेल हे तिला पाहायचं होतं. तिला खटकत होते त्याचे वारंवार कपाळावर येणारे केस. काहीसं संकोचून तिने शाहरुखला ते केस एका जागी ठेवशील का? असं विचारलं. शाहरुखने तसं करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आता तो नेटका दिसत होता, पण हेमाचं समाधान होत नव्हतं. शेवटचा उपाय म्हणून तिने आपल्या मेकअपमनला बोलावलं.शाहरुखच्या केसांना जेल लावून बसवण्यात आलं. हा प्रयोग यशस्वी झाला. शाहरुख हेमाला हवा होता तसा दिसू लागला.
ही सगळी धावपळ चालू असताना धर्मेंद्र तिथे आला. हेमाने त्याची शाहरुखशी ओळख करून दिली व म्हणाली, “हा माझ्या नव्या चित्रपटाचा नायक शाहरुख खान.” धर्मेंद्र, शाहरुख खानला पहिल्यांदा भेटत होते.
ज्या चित्रपटासाठी शाहरुख खानला नायकाच्या भूमिकेसाठी करारबद्ध करण्यात आलं होतं तो होता ‘दिल आशना है!’ या नायिकाप्रधान चित्रपटात डिंपल कपाडिया, अमृता सिंह, सोनू वालिया, दिव्या भारती, शाहरुख खान, कबीर बेदी, जितेंद्र आणि असिफ हे कलाकार होते.