भगवद्गीता – एक आनंदयात्रा

>> गुरुनाथ तेंडुलकर

भगवद्गीताकेवळ शब्द उच्चारला की, मनात अनेक भावभावना दाटून येतात. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याआधी उपस्थित सग्यासोयऱ्यांना, आप्तेष्टांना, बांधवांना, गुरुजनांना आणि इतर वडीलधाऱ्या मंडळींना आपल्याविरुद्ध उभे ठाकलेल्या शत्रुसैन्यात पाहिल्यानंतर अर्जुनाची मानसिक स्थिती संभ्रमित झाली होती. नेमकं काय करावं हे न उमगल्यामुळे किंकर्तव्यमूढ होऊन तो रथात बसला होता. हे सगळे माझेच स्वजन आहेत. यांच्याशी युद्ध करून जिंकलेलं राज्य मला नकोच. त्यापेक्षा मी वनवासात जाईन, भिक्षा मागून पोट भरेन, अशा प्रकारची क्षात्रधर्माला न शोभणारी वक्तव्यं तो करू लागला होता. अशा प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश करून पुन्हा कर्तव्यमार्गावर आणला तो उपदेश म्हणजे भगवद्गीता!

काही लोक विचारतात की, युद्धभूमीवर श्रीकृष्णाला अठरा अध्यायांची भगवद्गीता सांगायला वेळ होता का? याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीवर युद्धाला आरंभ होण्याच्या वेळी भगवंतांनी अर्जुनाला जो बोध केला तो केवळ शब्दांच्या माध्यमातून केलेला नव्हताच. आंतरिक जाणिवेतून उमगलेला असा शब्दांच्या पलीकडच्या भाषेतून झालेला तो संवाद होता. वेदव्यास मुनींनी महाभारताची रचना केली. संपूर्ण कुरुकुलाचा आणि त्याअनुषंगाने इतर अनेक घटनांचा इतिहास लिहिला. तो इतिहास म्हणजेच महाभारत ग्रंथ. या महाभारतातील भीष्मपर्वातील तेवीस ते चाळीस या अठरा अध्यायांत समाविष्ट असलेल्या सातशे श्लोकांत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात रणांगणावर झालेल्या त्या अगम्य भाषेतील संवादाला वेदव्यास मुनींनी शब्दरूप दिलं. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरचे अठरा अध्याय निर्मिले. तेच अठरा अध्याय आणि त्यातील सातशे श्लोक म्हणजेच आपली भगवद्गीता.

भगवद्गीतेचा आरंभ धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाने होतो आणि तिची अखेर होते ती संजयाने दिलेल्या उत्तराने. पहिल्या अध्यायातील पहिलाच श्लोक आहे…

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव  ।

मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय ।। 1 ।।

हे संजया, या धर्मक्षेत्रावर, या कुरुक्षेत्रावर युद्धासाठी उत्सुक असणाऱ्या माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय केलं ते मला सांग. धृतराष्ट्राच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून अठराव्या अध्यायातील अठ्ठय़ाहत्तराव्या म्हणजे अखेरच्या श्लोकात संजय म्हणतो…

यत्र योगेश्वर कृष्षो यत्र पार्थो धर्नुधर  ।

तत्र श्रीविजयो भूती धृवानीतिर्मति मम ।। 78 ।।

जिथे साक्षात योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जिथे अर्जुनासारखा वीर धनुर्धर आहे, त्याच बाजूला विजयश्री माळ घालणार याबद्दल मनोमन खात्री आहे.

धृतराष्ट्राचा प्रश्न आणि त्यावर संजयाने दिलेलं उत्तर, दोन्हीही जरा नीट समजून घेऊ या. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे, तर संजय हा दिव्यदृष्टी प्राप्त झालेला पुरुष आहे. म्हणजेच भगवद्गीतेचा प्रवास हा एका आंधळ्याच्या प्रश्नापासून सुरू होऊन एका दिव्यदृष्टीवान पुरुषाच्या उत्तराने संपतो. यातूनच आपल्याला समजतं की, हा ग्रंथ आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे नेणारा आहे. अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास आहे. आपण आज या प्रवासाला आरंभ केला आहे. पल्ला खूप लांबचा आहे. मार्ग खूपच कठीण आहे. तरीही आपण सर्व जण माझ्या सोबत चाललात तर हा प्रवास म्हणजे एक आनंदयात्रा ठरेल, अशी माझी खात्री आहे.

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।

[email protected]