
गस अॅटकिन्सच्या पहिल्यावहिल्या झंझावाती शतकी खेळीनंतर इंग्लिश गोलंदाजांनी पाहुण्या श्रीलंकन फलंदाजावर हल्ला चढवत त्यांचा पहिला डाव अवघ्या 196 धावांतच गुंडाळला. मात्र इंग्लंडने श्रीलंकेवर फॉलोऑन न लादता 231 धावांच्या प्रचंड आघाडीसह दुसऱ्या डावाच्या फलंदाजीला उतरणे पसंत केले.
पहिली कसोटी जिंकणाऱ्या इंग्लंडने आज आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 427 अशी दमदार मजल मारत दुसऱ्या कसोटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या डावातही ते धावांचा पाऊस पाडत श्रीलंकेसमोर धावांचा एव्हरेस्ट उभारण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे दुसरी कसोटी चौथ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
गुरुवारच्या 7 बाद 358 या धावसंख्येवरून अॅटकिन्सनने आपला झंझावात सुरू करत 103 चेंडूंत आपले पहिलेवहिले कसोटी शतक साजरे केले. त्याची खेळी 118 धावांवर थांबल्यानंतर इंग्लंडचा डावही 427 धावांवर संपला. अॅटकिन्सनने आपल्या 115 चेंडूंतील खेळीत 14 चौकारांसह 4 षटकारही खेचले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकन फलंदाजांना इंग्लिश माऱ्यापुढे नीटपणे उभेही राहता आले नाही.
खिस व्होक्स, गस अॅटकिन्सन, ऑली स्टोन आणि मॅथ्यू पॉट्सने प्रत्येकी दोन विकेट घेत पाहुण्यांची 8 बाद 153 अशी बिकट अवस्था केली. त्यानंतर कामिंदु मेंडिसने संघाचा फॉलोऑन टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो अपयशी ठरला.