गुटखा कंपनीच्या मालकांना-सूत्रधारांना ‘मोक्का’ लागणार

1201
प्रातिनिधिक फोटो

राज्यात गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी गुटखा कंपनीच्या मालकांवर व गुटखा रॅकेटच्या सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, माव्यावर बंदी घालूनही गुटख्याचे उत्पादन व विक्री करण्याच्या संदर्भात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

‘मोक्का’अंतर्गत कारवाई

आघाडी सरकारच्या काळात राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलीकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरून मोठय़ा प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जाते. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधी कधी हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मोक्का’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.

खबऱ्यांचे जाळे भक्कम करा

राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. गुटखा विक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे, आदी सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला निधी वाढवून देण्याचेही त्यांनी मान्य केले. गुटखाबंदीविरोधात जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या