
गुटखा विक्रेत्यांना मकोका लावण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला होता, त्यावर विधी व न्याय विभागाच्या मतानुसार धमकी व इजा असे गुन्हा असल्याशिवाय मकोका लावता येत नाही. त्यामुळे कायद्यात बदल करून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात गुटखाबंदी असतानाही नवी मुंबई, अहिल्यानगर, जालना, अकोला, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ आदी जिह्यांत मोठय़ा प्रमाणात गुटखा, पानमसाला, मावा आणि चरस-गांजाची विक्री सुरू आहे. गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून भाजीपाला, तेल, किराणा मालाची वाहतूक करणारे कंटेनर, ट्रक, टेंपोच्या माध्यमातून गुटख्याचा साठा विक्रेत्यांपर्यंत पोहचविला जात आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईतून उघड झाले आहे. या अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याबाबत प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात आजही ट्रक भरून बिनदिक्कतपणे गुटखा येतोय. यातले मोठे गुन्हेगार खुलेआम फिरतात. फक्त टपरीवाल्यांवर कारवाई होते. गुटखा विव्रेत्यांना पकडल्यावर त्यांची लगेचच जामिनावर मुक्तता होते. त्यामुळे गुटखा विक्री करणाऱयांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाईची मागणी अस्लम शेख यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपला कायदा इतका कमकुवत आहे की या लोकांना त्वरित जामीन मिळतो. म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करतात. म्हणून कायदा कडक करीत आहोत. गुटखा विव्रेत्यांना मकोको लावण्याच्या संदर्भात आम्ही कालच सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर मकोका लावता येईल. अशा पद्धतीने कायद्यात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत असे फडणवीस म्हणाले.
गुजरातमधून गुटखा
भिवंडीतील गुटखा रॅकेटचा विषय मांडला. गुजरातमधून आलेल्या गुटख्याचे भिवंडीत वितरण होत असल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
गुटख्यासोबत अमली पदार्थांची विक्री
गुटख्यासोबत चरस, गांजा, अफिम, एमडीची मोठय़ा प्रमाणावर मुंबईत विक्री होत आहे. आपली नवीन पिढी यामध्ये गुंतली आहे. प्रत्येक जिह्यात पुनर्वसन पेंद्र सुरू करणे गरजेचे आहे असे काँग्रेस आमदार अमिन पटेल म्हणाले.



























































