गेवराईत लाखोंचा गुटखा पकडला

सामना प्रतिनिधी । गेवराई

शासनाने बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याची आंध्रप्रदेशातील हैद्राबादहून संभाजीनगरकडे वाहतूक करणारा टेम्पो पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला. या कारवाईत टेम्पोसह जवळपास ३० लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याबाबत अन्न, औषध विभागाशी संपर्क साधला असता कारवाई झाली परंतु आमचे अधिकारी विधीमंडळ समिती बीडमध्ये येत असल्याने गेवराईत पोहचले नाही. लवकरच आम्ही गेवराईत दाखल होवून तपासणी करणार असल्याचे या विभागाचे अनिकेत भिसे यांनी सांगीतले.

पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवार (दि.२८) रोजी रात्री हैद्राबादहून संभाजीनगरकडे जात असलेला एक टेम्पो (क्र.एम.एच.०३ सी.पी.५३८१) गेवराई शहरातील एका पेट्रोल पंपाजवळ अडवला. या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी आतमध्ये पाहणी केली तेव्हा त्यात विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. त्यानंतर हा गुटखा टेम्पोसह बीड ग्रामिण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला होता. मात्र सदरील कारवाईची हद्द गेवराई पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टेम्पो चालकासह पकडलेला माल गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. या कारवाईत लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.