सोशल मीडियावरचे फॉलोअर्स किंवा पोस्ट केलेल्या फोटो, व्हिडीओला मिळणाऱ्या लाइक्सवर एखाद्या व्यक्तीच्या प्रसिद्धीचे मोजमाप केले जाते, त्यामुळे या आधुनिक जमान्यात बहुतांश नागरिक लाईक्सचे भुकेले असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, अशा लोकांना टार्गेट करून हॅकर्स गंडा घालत असल्याच्या घटना वाढत आहेत. ‘तुमचे फॉलोअर्स, लाईक्स वाढवून देतो’, असे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढून लाखो रुपये लुबाडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा आमिषापासून सावध राहून, खातरजमा करूनच पैशांचा व्यवहार करावा, असा सल्ला सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.
मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, बालचमूपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोबाईल आणि सोशल मीडियाने अशरक्षः वेड लावले आहे. अनेकजण दररोजच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. खाद्यपदार्थांचे फोटो, स्वतः चे फोटो किंवा भ्रमंतीसाठी गेल्यावर काढलेले फोटो, व्हिडीओ शेअर करण्यास अनेकजण पसंती देतात. पूर्वी फेसबुक या एकमेव माध्यमाचा वापर सर्रास केला जायचा. नंतरच्या काळात इन्स्टाग्राम, शेअर चॅट, स्नॅप चॅट, टिकटॉक यांसह अन्य सोशल मीडियावर अॅप्समुळे सोशल मीडियाच्या क्षेत्रात क्रांती घडली.
जितके जास्त लाईक्स तितके पैसे
कोरोनाच्या नंतर रील्स शेअर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सध्या अनेकजण हे रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले असून, रील्स शेअर केल्यावर त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यामध्ये विविध विषयांवर आधारित रील्सचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर तासन्तास लोक हे रील्स बघण्यात घालवतात. त्यामुळे आपणही प्रसिद्ध व्हावे, सोशल मीडियातून आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी अनेकजण झगडत असतात. मात्र, फॉलोअर्स कमी असल्यामुळे लाईक्स कमी मिळतात. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो.
असे ओढले जाते जाळ्यात
प्रसिद्धीची हाव असलेल्या लोकांना हेरून हॅकर्स त्यांच्याशी सोशल मीडियावर किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधतात. तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असतील किंवा तुम्ही शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओला अधिकाधिक लाईक्स मिळविण्यासाठी 5 हजार ते 25 हजार रुपये भरण्यास सांगितले जाते. सुरुवातीला काही लाईक्स मिळवून देत विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर पुन्हा लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळवून देण्यासाठी अधिक पैशांची मागणी केली जाते. त्यानंतर नागरिकांची फसवणूक केली जाते.
फॉलोअर्स वाढवून तुम्हाला उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवले जाते. त्यानंतर ते नागरिकांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा अॅक्सेस घेतात. सुरुवातीला ते लाईक्स मिळवून देतात. मात्र, त्यानंतर ते अकाऊंटचा पूर्णच ताबा घेतात. या अकाऊंटचा ताबा पुन्हा हवा असल्यास पैशांची मागणी करून ब्लॅकमेल केले जाते. सोशल मीडियावर फॉलोअर्स किंवा लाईक्स वाढवून देण्यासाठी काही अधिकृत कंपन्या कार्यरत आहेत. तर, तुम्हाला लाईक्स, फॉलोअर्स वाढवायचे असतील तर अशा अधिकृत कंपन्यांचाच आधार घ्यावा.