
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याचा गुप्त ठिकाणा समोर आला आहे. उपग्रहांद्वारे घेतलेले फोटो आणि व्हिडिओंमधून हाफिज सईद पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहात असल्याचे समोर आले आहे. कडेकोट सुरक्षेत हाफिज सईद आलिशान जीवन जगतोय.
उपग्रहांद्वारे घेतलेले फोटो आणि व्हिडिओमध्ये हाफिज सईदचे घर दिसत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात हाफिज सईद आरामात जगतोय. लाहोरच्या जोरम टाउनमध्ये राहात असलेल्या हाफिज सईदला पाकिस्तान सरकारची सुरक्षा आहे. हाफिजला त्रिस्तरीय सुरक्षा दिल्याचे सांगण्यात येते. याशिवाय त्याचे खासगी सुरक्षा रक्षकही चोवितास तैनात असतात. ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त दिले असून काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.
पहलगाम हल्ल्यात एका दहशतवाद्याची ओळख पटली, पाकिस्तानशी आहे कनेक्शन
हाफिज एका इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्या इमारतीच्या बरोबर समोर हाफिजचा प्रायव्हेट पार्क आहे. त्याच्या बाजूच्याच इमारतीत मशिद आणि मदरसा आहे. त्याच्या खाली बंकर बांधण्यात आलेला आहे. तिथे त्याची सुरक्षा यंत्रणा आहे. तिथून हाफिज ऑपरेट करतो. हा संपूर्ण परिसर 5000 स्क्वेअर फूटहून अधिक आहे. दहशतवादी हाफिज हा अनेक वर्षांपासून कुटुंबासोबत इथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हाफिज सईद हा लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. मुंबईवरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद मास्टरमाईंड आहे. संयुक्त राष्ट्रांकडून त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लश्करचे हेडक्वॉर्टर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतमधील मुरिदकेमध्ये असल्याचे सांगण्यात येते.