
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रभाकर कारू राऊत (55) यांना पोटात दुखत होतं. वेदना वाढल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांना मुतखड्यामुळे वेदना होत असल्याचं निदान करण्यात आलं होतं. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी जेव्हा हा खडा बाहेर काढला तेव्हा ते देखील आश्चर्यचकीत झाले होते. कारण या मुतखड्याचे वडन जवळपास अर्धा किलो इतके होते. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधीमधील डॉक्टर सुमित जयस्वाल यांनी तीन तासाचा यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हा मुतखडा बाहेर काढला.
का होतो मुतखडा
- लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
- पाणी अथवा द्रव पदार्थ कमी घेण्याने, श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा होऊ शकतो
- मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे मुतखडा होऊ शकतो
- लघवीचे प्रमाण कमी झाल्याने ही समस्या उद्भवू शकते
- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात
- रक्तातील व लघवीतील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडचे मुतखडे तयार होतात
लक्षणे
सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.


























































