
सांगली व कुपवाड शहरात गॅस वाहिनीच्या कामात अनियमितता झाली आहे. प्रत्यक्षात परवानगी 204 किलोमीटरची असताना जादा काम झाले आहे. शिवाय गॅस वाहिन्या टाकताना मनपाच्या जलवाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या फोडल्या आहेत. त्याची दुरुस्तीदेखील केली नसल्याची तक्रार करत महासभेत सदस्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. त्यामुळे महापौरांनी गॅस वाहिनीचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले, तर झालेल्या कामाची चौकशी करून पुढच्या महासभेत अहवाल सादर करावा. जर पेट्रोलियम कंपनीने काम सुरू केल्यास कंपनीवर फौजदारी दाखल करा, अशा सूचना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सांगली महापालिकेची विशेष महासभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महासभेत गॅस वाहिनीचा विषय चांगलाच गाजला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड म्हणाले, सांगली व कुपवाड शहरातील प्रभाग 8, 9, 10, 17, 19 मध्ये गॅस वाहिन्यांचे काम करण्यासाठी मनपाने एका पेट्रोलियम कंपनीला परवानी दिली होती. 204 कि.मी.ला परवानगी असताना कंपनीने जादा काम केले आहे. शिवाय शहरातील जलवाहिन्या व ड्रेनेजलाइन फोडल्या आहेत. त्याची दुरुस्ती सहा महिने झाले तरी केली नाही. कंपनीला दहा लाख रुपये दंड पाणीपुरवठा विभागाने केला आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप दंड वसूल केला नाही. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले, गॅस वाहिनी टाकताना जलवाहिनी फुटल्यास आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे करारपत्रात नमूद केले आहे. शिवाय कोणत्याही भागात काम सुरू करताना प्रथम बांधकाम विभागाला एक दिवस अगोदर दाखविण्याची अट आहे. पण कंपनीने परस्पर काम सुरू केले आहे.
माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, प्रभाग 17 मध्ये गॅस वाहिनीचे काम करताना नवीन केलेला रस्ता 550 मीटर उकरला आहे.कंपनीने त्याची दुरुस्ती केली नाही. शिवाय कंपनीकडून परवाना देताना 7 कोटी 4 लाख रुपये भरून घेतले आहे. ही रक्कम खोदाई केलेल्या चरी बीबीएम करून भुजविण्यासाठी होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी परस्पर ही रक्कम जनरल फंडाला वर्ग केली आहे. त्यामुळे रस्त्यांचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती झालेली नाही.
महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कंपनीच्या कामावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, शहरात परवानगी दिल्यापेक्षा जादा काम कंपनीने केले असल्याची तक्रार अनेक सदस्यांची आहे. त्यामुळे तातडीने कंपनीचे काम थांबविण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले. तर किती किलोमीटरची परवानगी दिली आणि किती किलोमीटरचे काम झाले, याची तपासणी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना घेऊन सविस्तर अहवाल पुढच्या महासभेत सादर करावा. पाणीपुरवठा व ड्रेनेज वाहिन्या फुटलेल्या आहेत. त्या आठ दिवसांत कंपनीकडून दुरुस्त करून घ्यावे. जर कंपनीने नव्याने काम सुरू केल्यास तत्काळ फौजदारी दाखल करण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले.
कंपनीकडून विनापरवाना बांधकाम
n टिंबर एरिया अग्निशमन कार्यालयाच्या मागील बाजूस मनपाची जागा गॅस कंपनीला दिली गेली आहे. कंपनीच्या वतीने डीआरएस मशिन बसवले आहे. त्यासाठी बांधकामदेखील केले आहे. हे बांधकाम करताना मनपाचा बांधकाम परवाना घेतलेला नाही. त्यामुळे कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी महासभेत केली. महापौरांनी हे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले.



























































