
ढोल-ताशांचा गजर आणि ‘ढाकू माकूम’च्या गजरात दापोलीची बाजारपेठ दुमदुमून गेली. अबालवृद्धांनी ठेका धरत हनुमान जन्मोत्सवाचा आनंद लुटला.

श्री देव मारुती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड बाजारपेठ दापोली यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव 2026 चा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री स्वयंभू मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यावर्षीही त्याच भक्तीभावाच्या भावनेने साजरा करण्यात आला.

जोग नदीच्या काठावर वसलेल्या स्वयंभू श्री हनुमान देवतेची मूर्ती पंचमुखी आहे. दापोलीतील लोकांची या मारुतीरायांवर अनन्य श्रद्धा असल्यामुळे येथील हनुमान जयंती उत्सव दापोलीतील उत्सवाचा मानबिंदू आहे. अशा या उत्सवाची खरी सुरुवात ही श्रीराम नवमीपूर्वीच मंदिरातील छताच्या भागास सुंदर पताकांची आरास करत करण्यात आली होती. शिवाय मंदिरातील गाभाऱ्यातील श्री हनुमंताची मूर्ती देखील अतिशय सुंदर प्रकारे अशाप्रकारे सजविण्यात आली होती.

संपूर्ण मंदिराला आकर्षक अशा रोषणाईचा झगमगाट करण्यात आला होता. चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंती दिवशी गुरुवारी पहाटे ५.३० वाजता नागपूर येथील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. दिगंबरबुवा नाईक यांनी श्री हनुमान जन्मकाळाचे किर्तन केले. त्यानंतर सकाळी ६.२० वाजता श्रींचा जन्मकाळाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

हनुमंताची न्हाणी व पाळणा पार पडल्यानंतर देवभेट व आरती झाली यावेळी दापोलीकर अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री हनुमानाच्या रथाने मंदिरास प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम पार पडण्यात आल्यानंतर शहरातील ठरलेल्या मार्गाने भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीमध्ये खालु बाजा, धावजीचा बाजा, ढोल-ताशे, भजनाची दिंडी सामील झाली होती. या रथ मिरवणुकीतील दापोलीकरांनी केलेल्या गर्दीने उत्सवाची भव्यता दिसून आली.































































