हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, अगोदर टपाली मते मोजण्यात येतील. सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही राज्यांचा कल हाती येण्याची शक्यता आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तर हरयाणात 5 ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. हरयाणात 90 तर जम्मू-कश्मीरमध्येही 90 जागांसाठी मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दोन्ही राज्यांत मतदारांनी भाजपला अव्हेरल्याचे चित्र समोर आले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, सुरुवातीला टपाली मते मोजण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात येईल.
जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 काढल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, कश्मीरमधील घराणेशाही आदी विषय या निवडणुकीत चर्चेत आले. परंतु, सर्वात अधिक चर्चा कश्मिरी तरुणांच्या रोजगारावर झाली. हरयाणातही भाजपविरोधातील रोष प्रकट झाला. अग्निवीर, शेतकर्यांचे प्रश्न, महिला कुस्तीपटूंवरील अन्याय आदी विषय हरयाणा निवडणुकीत ज्वलंत होते.
एक्झिट पोलनुसार हरयाणात काँग्रेस
हरयाणा आणि जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभेचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्याआधी एक्झिट पोल समोर आले असून हरयाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दहा वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. तर जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि नॅशल कॉन्फरन्स या दोन पक्षांची सरशी होताना दिसत असून केंद्रातील सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का आहे.