
कायद्याने प्रौढ व्यक्तीला आपल्या पसंतीने लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण देशाच्या अनेक भागांत आजही प्रेमविवाह करणाऱया युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक छळ व त्रास सहन करावा लागतो. मध्य प्रदेशच्या रतलाम जिह्यातील पंचेवा गावात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या गावात प्रेमविवाह करणाऱ्या युवक आणि युवतीच्या कुटुंबांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याची उघडपणे घोषणाच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओही बनवण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडीओतील युवक सांगतो, समस्त पंचेवा ग्रामस्थांकडून असा निर्णय घेण्यात आलाय की गावातील जो कुणी युवक अथवा युवती पळून जाऊन लग्न करतील. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सार्वजनिक बहिष्कार टाकला जाईल. या कुटुंबाला सामूहिक बहिष्कृत केले जाईल. त्यांना कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाणार नाही. प्रेमविवाह करणाऱया व्यक्तींसोबत जो साक्षीदार बनेल त्याच्यावरही बहिष्काराची कारवाई केली जाईल, असे फर्मान काढण्यात आले. या व्हिडीओत प्रेमविवाह करणाऱ्या 3 कुटुंबांची नावेही घेण्यात आली. जर गावातील कुणी बहिष्कृत केलेल्या कुटुंबाला मदत केली तर त्यांच्यावरही सामूहिक बहिष्कार टाकला जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची स्थानिक प्रशासनाने दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे.



























































