
नागपूरमध्ये 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दिक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. 28 तारखेला क्रांतीवीर भगतसिंह यांच्या बलिदानदिनी मशाल मोर्चा काढला जाणार असून संविधान चौकात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 29 तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाची प्रत भेट देणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. 100 वर्ष पूर्ण करणाऱया रा. स्व. संघाने आता तरी नथुराम आणि विखारी विचार सोडून समता बंधुता सामाजिक न्यायाचे संविधान तसेच गांधी विचार स्वीकारावेत, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
भारताचे संविधान ही ऐतिहासिक घटना असून संविधान भारताची प्रेरणा आहे. संविधान हे मनुस्मृतीवर आधारीत असावे, अशी र संघाची अपेक्षा होती. गोळवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसे पत्र पाठवले होते. पण आम्ही विशिष्ट लोक हा संघाचा विचार आहे, तर संविधानाचा विचार हा आम्ही भारताचे लोक असा आहे. गोळवलकर यांचे ’बंच ऑफ थॉट’ हे संघ आणि भाजपचे बायबल आहे. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष संघाने त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा सुद्धा फडकवला नव्हता, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.
फडणवीस निवडणूक आयोगाची दलाली करतात
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचे पुरावे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय आहे. त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधान मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरीही फडणवीस हे निवडणूक आयोगाची दलाली करत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.