विनेशला चार कोटीचे बक्षीस, मनुला पाच तर नीरजला चार कोटी; हरयाणा सरकारचा ऑलिम्पिकवीरांवर धनवर्षाव

लिम्पिक विजेत्यांचा सत्कारसोहळा आचारसंहिता लागू झाल्यामुळे रद्द करण्यात आला असला तरी हरयाणा राज्य सरकारने आपल्या ऑलिम्पिकवीरांना रोख पुरस्कार जाहीर केले. ज्यात वजनवाढीमुळे पदक हुकलेल्या कुस्तीपटू विनेश पह्गाटला रौप्य पदक विजेत्याचे चार कोटींचे इनाम दिले आहे. तसेच दोन कांस्य जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकरला पाच कोटी, तर रौप्य पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा चार कोटींचा मानकरी ठरला आहे.

आज हरयाणा सरकारने आपल्या राज्यातील खेळाडूंवर पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव केला. विशेष म्हणजे, हिंदुस्थानने जिंकलेल्या पाच वैयक्तिक पदकांपैकी चार पदके हरयाणाच्याच पाच खेळाडूंनी जिंकली होती. मनु, विनेश आणि नीरजसह नेमबाज सरबज्योत सिंग आणि कुस्तीपटू अमन सेहरावत हे दोघेही हरयाणाचेच आहेत. हरयाणा सरकारने रौप्य पदक विजेत्यांना चार कोटी, तर कांस्य पदक विजेत्यांना अडीच कोटी रुपये जाहीर केले होते. तसेच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 16 हरयाणवी खेळाडूंनाही प्रत्येकी 15 लाखांचे इनाम दिले. हरयाणातील एकूण 24 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते.