
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोलकाता येथील रहिवासी 36 वर्षीय बितन अधिकारी यांचा मृत्यू झाला. बितान अमेरिकेत काम करत होते आणि पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवण्यासाठी भारतात आले होते. 16 तारखेला पत्नी सोहिनी आणि तीन वर्षांच्या मुलासह काश्मीरला गेले, ते 24 एप्रिलला घरी परतणार होते. परंतु याच दरम्यान त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बितानच्या पत्नीशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले बितन अधिकारी कोलकात्यातील पाटुली भागातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे शेजारी आणि नातेवाईक दुःखात बुडाले आहेत. बितान यांचा चुलत भाऊ दीपक अधिकारी म्हणाला की, त्यांच्या कुटुंबाला काही आर्थिक समस्या येत होत्या. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता म्हणून दीपकने त्याला रजेवर जाण्याचा सल्ला दिला. बितान 8 एप्रिलला अमेरिकेहून कोलकात्याला परतला. बंगाली नववर्ष पोईला साजरे केल्यानंतर तो त्याच्या कुटुंबासह कश्मीर सहलीला गेला.
16 एप्रिलला बितानसह पत्नी आणि मुलगा कश्मीरला निघाले. दीपक म्हणाला की बितानने त्याला त्याच्यासोबत येण्यास सांगितले होते, पण त्याने नकार दिला होता. टूर दरम्यानही बितानला मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तो दीपकशी बोलत असे. मी त्याला वारंवार घोडेस्वारी करण्यापासून परावृत्त करत होतो. परंतु बितानने ऐकले नाही आणि बघा आज काय घडलंय, मी त्याच्या मुलाला काय तोंड दाखवू?’
कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री अरुप बिस्वास यांनी मृत बितन अधिकारी यांच्या घरी पोहोचून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बितानच्या पत्नीशी फोनवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “जम्मू आणि कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. पीडितांपैकी एक, बितन अधिकारी, पश्चिम बंगालचा आहे. माझे सरकार त्यांचे पार्थिव कोलकाता येथील त्यांच्या घरी परत आणण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहे.”