हिंदुस्थानातील कुस्ती महासंघ गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चेचा विषय ठरला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीपटू विनेश फोगट रौप्यपदकाला मुकली. विनेश फोगटचे 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतून तिला अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र यासाठी विनेशने तिचे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र यामुळे कदाचित तिला तिचा जीव गमवावा लागला असता, अशी धक्कादायक माहिती विनेशच्या प्रशिक्षकाने दिली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशचे प्रशिक्षक वोलार अकोस यांनी विनेशने वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त आढळून आले होते. उपांत्य फेरित तिचे वजन 2.7 किलोने वाढले. यासाठी विनेशने तासभर तरी व्यायाम केला. मात्र एवढं करूनही तिचे वजन 1.5 किलोग्रॅम जास्तच भरले होते, असे वोलार अकोस यांनी यावेळी सांगितले.
विनेशने सगळे प्रयत्न करून बघितले होते. तिने मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले. या सगळ्या वेळेत ती फक्त दोन मिनिटांची विश्रांती घ्यायाची. त्यामुळे ती खूप थकून गेली होती. सातत्याने कार्डिओ मशिनवर चालून ती एकदा खाली पडली. मात्र आम्ही तिला अथक प्रयत्नांनतर पुन्हा उठवले. मी हे सगळं मुद्दाम किंवा गोष्ट रचून सांगत नाही. मला तर असं वाटत की वजन कमी करायच्या नादात त्या रात्री तिचा जीव गेला असता, असे विनेशचे प्रशिक्षक वोलार अकोस यांनी सांगितले.