अजूनही विनेशला पदक मिळू शकते; वकील सिंघानिया यांना आशा

कुस्तीपटू विनेश फोगाटला अजूनही पदक मिळू शकते, अशी आशा तिचे वकील विदुषपत सिंघानिया यांनी व्यक्त केल्यामुळे ऑलिम्पिकचे पदक प्रकरण अजून संपलेले नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

आपल्या 100 ग्रॅम वजन वाढीमुळे विनेश पह्गाटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिचे पदक हुकले होते. त्यानंतर तिने आपल्याला किमान संयुक्त रौप्य पदक दिले जावे, अशी याचिका आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (पॅस) केली होती. त्यानंतर तिच्या याचिकेबाबत लवादाने तारीख पे तारीख खेळ करत वारंवार प्रकरण लांबवले होते, पण त्यांनी बुधवारीच आपल्या एक ओळीचे निवेदन जारी करताना विनेशचे अपील फेटाळल्याचे स्पष्ट केले होते.

हा निर्णय ऐकून विनेश आणि तिच्या वकिलांना जबर धक्का बसला होता. मात्र जारी केलेल्या निवेदनात विनेशची याचिका का फेटाळली याचे स्पष्ट कोणतेही कारण लवादाने दिलेले नाही. तसेच या निकालाला वारंवार तारखा का देण्यात आल्या तसेच खटला निकाली काढण्यात लवादाने इतकी तत्परता का दाखवली, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे येत्या आठवडय़ात या निकालाची प्रत हातात पडल्यानंतर या निकालाबाबत पूर्ण माहिती मिळू शकेल, अशी माहिती सिंघानिया यांनी दिली. ही माहिती समोर आल्यानंतर न्यायाधीशांनी कोणत्या गोष्टींच्या आधारावर आपला निर्णय दिला, हे स्पष्ट होईल. त्यामुळे विनेशची याचिका फेटाळली असली तरी तिच्या पदकाची आशा अजूनही जिवंत आहे.

पुन्हा याचिका दाखल करणार
विनेशच्या फेटाळलेल्या याचिकेची सविस्तर माहितीनंतर आम्हाला 30 दिवसांच्या आत पुन्हा अपील करता येईल, अशी माहिती वकील सिंघानिया यांनी दिली. त्यामुळे ‘कॅस’कडून न्याय न मिळाल्यास त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्वित्झर्लंड येथील स्विस फेडरल ट्रिब्युनल या न्यायालयात जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आव्हान देणाऱया अपिलाबाबत काम करणार असल्याचेही ते म्हणाले.