पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच पार पडणार असून या काळात आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय होणे अपेक्षित नसल्याने ‘काम बंद’ आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय आरोग्य आणि आशा सेविकांनी घेतला आहे. मात्र मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरूच राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
किमान वेतन भविष्य निर्वाह निधी जुनी पेन्शन योजना लागू करणे, महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पगार मिळणे अशा विविध मागण्यांकडे पालिका व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चार हजार आरोग्य व आशा सेविकांनी अनेकदा काम बंद आंदोलन छेडले होते. यातच मार्चमध्ये झालेल्या आंदोलनानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पगारवाढीचे आश्वासन दिले, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या आणि मागण्या प्रलंबित असणाऱ्या आशा-आरोग्य सेविकांनी मंगळवारपासून आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. आता मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आरोग्य व आशा सेविकांनी घेतला आहे.