शाळा सुरू झाली; प्रवेश प्रक्रिया सुरू होईल का? पालकांचा सवाल

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांतील आरटीईच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासंदर्भात उद्या 18 जून रोजी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. उद्या या प्रश्नी निकाल लागून आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल का, असा सवाल पालकांनी केला आहे.

आरटीईच्या प्रवेशाची सोडत 7 जून रोजी जाहीर करण्यात आली. मात्र यासंदर्भात न्यायालयीन सुनावणीची प्रक्रिया रखडल्याने सोडतीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. यासाठी सुरुवातीला 12 जून रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली. आता ही सुनावणी उद्या मंगळवारी 18 जून रोजी होण्याची शक्यता असल्याने यादरम्यान तरी आरटीई प्रवेशाचा तिढा संपेल काय, असा सवाल पालक करत आहेत.

शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला होता, त्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाने आरटीईचे प्रवेश हे केवळ खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, मात्र त्यातील काही शाळांनी प्रवेशासाठी आक्षेप घेतल्याने विषयांसंदर्भात सुनावणी सुरू असून त्यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

– न्यायालयातील सुनावणीनंतर आरटीईच्या सोडतीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची शाळानिहाय प्रवेशाची यादी जाहीर केली जाणार आहे.
– त्यानंतर ज्या जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत, अशा जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.