रत्नागिरीत मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज दिवसभर पावसाची बॅटींग सुरु होती. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 262.35 मिमी पाऊस पडला. दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने आता चांगला जोर धरला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मंडणगडमध्ये 5.50 मिमी, दापोलीमध्ये 11.28 मिमी, खेडमध्ये 17.57 मिमी, गुहागरमध्ये 38.40 मिमी, चिपळूणमध्ये 29.11 मिमी, संगमेश्वरमध्ये 40.83 मिमी, रत्नागिरीमध्ये 62.11 मिमी, लांजामध्ये 36.80 मिमी आणि राजापूरमध्ये 20.75 मिमी पाऊस पडला. समाधानकारक पाऊस सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. उन्हाळ्यात या नद्यांमधील पाणी कमी झाले होते. जगबुडी नदी, वसिष्ठी नदी, शास्त्री नदी, सोनवी नदी, काजळी नदी, गोदावरी नदी, मुचकुंद्री नदी आणि बावनदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.