मुंबई ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस, मध्य आणि हार्बर लोक 10 ते 15 मिनिटे उशिरा

मुंबई आणि ठाण्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून मध्य आणि हार्बरची सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

अंधेरी सबवेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे इथल्या दोन्ही वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. इथली वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पुलावर वळवण्यात आली आहे.

फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या अनेक भागांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.


अकरावी प्रवेशाची तारीख पुढे ढकलली

राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे आज अकरावीसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 22 तारखेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.