Nashik Rain News : नाशकात गोदावरी नदीची पातळी वाढली, पुरातन मंदिरं पाण्याखाली

राज्यात मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. असे असले तरी अनेक भागात पावसामुळे दाणादाण उडाली आहे. पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागात पाणी साचले असून लोणावळा आणि महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने एनडीआरएफ आणि सैन्याला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

पुरातन मंदिरं पाण्यात 

नाशकात पावसाची संततधार सुरूच असल्याने गंगापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे गोदाघाट आणि अनेक पुरातन मंदिरं पाण्यात गेली आहेत. पुराचा धोका पाहता प्रशासाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. खबरदारी म्हणून गोदा घाटातली दुकानं बंद करण्यात आली आहेत.


मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट

येत्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे.