
कराड, वाई शहरांसह जिह्याच्या पश्चिम भागात काल रात्रीपासून पुन्हा धुवाँधार पाऊस सुरू असून, कोयना, धोम, उरमोडी आदी धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसातील जोरदार पावसामुळे पश्चिम भागात रस्त्यांची चाळण झाली असून, कंत्राटदारांचे ‘लाड’ चव्हाटय़ावर आले आहेत.
जिह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावली, महाबळेश्वर तालुक्यांत पावसाचा जोर असून, त्या खालोखाल सातारा, कराड, वाई, काही प्रमाणात खंडाळा तालुक्यात पर्जन्यवृष्टी होत आहे. पूर्व भागात मात्र पावसाचे प्रमाण अल्प आहे. सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून प्रतिसेकंद 42 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनापात्रात सुरू आहे. त्यात धोम धरणातील विसर्ग प्रतिसेकंद 3622 क्युसेक करण्यात आला आहे.
उरमोडी धरणातून आज प्रतिसेकंद 1629 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे सर्व पाणी कराडपर्यंत टप्प्याटप्प्याने कृष्णा नदीत मिसळत असल्याने कृष्णामाईच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा सरासरी 80 टक्क्यांच्या वर गेला असून जिह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 125.89 टीएमसी इतका झाला आहे.