मुंबईत संततधार सुरूच, आजही मुसळधार पावसाचा इशारा

447

मुंबईत गेले काही दिवस सुरू असलेल्या जोरदार सरी आणि संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात काही जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. पुढील काही दिवस पावसाची ही हजेरी अशीच कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाप्रमाणे आता पावसाचे विसर्जन कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात गेले काही दिवस जोरदार सरी आणि संततधार सुरू आहे. शुक्रवारपासून बरसणाऱया पावसाच्या जोरदार सरी आणि संततधार आजही कायम होती. त्याचबरोबर ढगाळ वातावरणही कायम होते. मुंबईत बऱयाच ठिकाणी झाडे, फांद्या तसेच घराच्या भिंती आणि काही भाग पडण्याच्या घटना घडल्या. घाटकोपर पश्चिममध्ये आज वाडिया शेठ चाळीतील एका घराच्या बाथरूमचा काही भाग कोसळून परमेश्वर पांडे (45) ही व्यक्ती किरकोळ जखमी झाली.

आजही बरसणार

येत्या 24 तासांत मुंबई, रायगड, पालघरमध्येही जोरदार सरी आणि संततधार कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत बसवलेल्या रडारच्या सहाय्याने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काही दिवस जोरदार सरी आणि संततधार कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या