सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला; काही ठिकाणी लावणीची कामे तर अनेक भागात शेत जमीन नांगरणीला वेग

मृग नक्षत्रानंतर खऱया अर्थाने सुरुवात झालेला पाऊस शेतीयोग्य पद्धतीने कोसळत असून बळीराजा दुखावला आहे. देवगड, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवलीसह जिह्यात पावसाचा जोर असून काही भागात महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या भाताची लावणी करण्याबरोबरच अनेक ठिकाणी नांगरणीची (उखळ, दुड) कामे करण्यावर शेतकऱयांकडून भर दिला जात असून हंगामी उत्पादन देणाऱया काकडी, चिबूड, दोडके, पडवळ, कणगी यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी गावोगावी वाफे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील काही दिवस कमी अधिक प्रमाणात कोसळणाऱया पावसाने शेती पूरक पाणी उपलब्ध केले असून शेतकऱयांनी शेती कामावर लक्ष पेंद्रित केले आहे. डोंगर भागात वाडय़ा वस्त्यांवर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होण्यात पावसाने सध्या मोठी भूमिका बजावली आहे. विहिरींची पातळी वाढली असल्यामुळे गावात गावांमधील पाणी समस्या मार्गी लागली आहे.

चढणीच्या माशांची आतुरता
गेले अनेक दिवस मोठया आशेने डोळे लावून बसलेल्या चढणीच्या माशांसाठी खवय्ये आतुर झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी, ओहळातून पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खवळे वाळई, शेंगटी, ब्याल, मळवे, खरचे, खेकडे यासारखे मासे पकडण्यासाठी स्थानिकांनी तयारी केल्याचे दिसून येते.

आंबा, काजूसह बागायतींना भर
सिंधुदुर्गात दिवसेंदिवस भातशेती लागवडीचे क्षेत्र कमी होताना दिसत असून शेतकऱयांनी आंबा, काजूसह इतर बागायती तयार करण्यावर भर दिला असल्याचे दिसून येते. नवीन कलम लागवड करतानाच जुन्या, नवीन झाडांना सध्या सेंद्रिय खत, लेंडी खत, कुजलेला पालापाचोळा याबरोबरच रासायनिक खताची मात्रा देण्यावर शेतकऱयांनी लक्ष केंद्रित केले आहे.