ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

मुंबई, ठाण्यासह एमएमआरडीए क्षेत्रात आज पहाटेपासून अवकाळी पावसाने धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले. परिणामी दोन्ही मार्गांवर लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडून पडले. पावसामुळे सर्वच गाडय़ा 20 ते 30 मिनिटांच्या विलंबाने धावत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक लोकल गाडय़ांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. परिणामी मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी क्रमांक चारच्या फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटांवर पाय ठेवायलाही जागा नव्हती.