
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राजधानी देहराडूनसह राज्याच्या विविध भागात सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ओसंडून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांनी घरे, रस्ते आणि पूल वाहून नेले आहेत. रस्ते पूल वाहून गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सुमारे ९०० जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (USDMA) मते, सर्वाधिक नुकसान देहरादून जिल्ह्यात झाले आहे, जिथे १३ जणांनी आपले प्राण गमावले. याव्यतिरिक्त, नैनिताल आणि पिथोरागडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. डेहराडून जिल्ह्यातील विकासनगर भागात टोंस नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. दरम्यान नदी ओलांडणारा एक ट्रॅक्टर-ट्रॉली जोरदार प्रवाहात उलटून वाहून गेली. या अपघातात मुरादाबाद जिल्ह्यातील मुधिया जैन गावातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांमध्ये फरमान, सोमवती, रीना, हरचरण, नरेश आणि मदन यांचा समावेश आहे. हरिओम, राजकुमार, किरण आणि सुंदरी यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
मुसळधार पावसामुळे देहरादूनमधील सोंग आणि टोंस नद्या दुथडी भरून वाहत होत्या. प्रसिद्ध तपकेश्वर महादेव मंदिराचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि प्रवेशद्वारावरील भव्य हनुमान मूर्तीचा अर्धा भाग पाण्याखाली गेला. पुजारी विपिन जोशी म्हणाले की, गेल्या २५-३० वर्षांत नदीची पाण्याची पातळी कधीही इतक्या उंचीवर पोहोचली नव्हती.
देहरादून-मसूरी मार्गासह अनेक रस्ते खराब झाले आहेत आणि पूल वाहून गेले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पौंडा परिसरातील देवभूमी इन्स्टिट्यूटमध्ये पुराचे पाणी शिरल्यानंतर ४०० हून अधिक विद्यार्थी अडकले होते आणि बचाव पथकांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर (एसईओसी) नुसार, आतापर्यंत विविध भागातून ९०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. देहरादून व्यतिरिक्त, टिहरी आणि नैनिताल जिल्ह्यांमध्येही अडकलेल्या लोकांना बचाव पथकांनी बाहेर काढले. तीन जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





























































