
मंत्रालय परिसर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन चौथ्या दिवशी दक्षिण मुंबईत सुरू असताना मंत्रालयाभोवती तीन पातळ्यांच्या बॅरिकेड्स लावण्यात आल्या. प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलीस तैनात असून आंदोलनकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे. मंत्रालयाबाहेर राज्य राखीव पोलीस बल (SRPF) नेमण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलन तीव्र झाल्याने मंत्र्यांच्या निवासस्थानांबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कार्यालयात परतणार असल्याने वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक बदलाची माहिती दिली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास सीएसएमटी चौक आणि आसपासच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जे.जे. रोडवरील गाड्या एमआरए मार्ग पोलिस ठाण्याकडून पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामार्गे मेट्रो सिनेमा चौकाकडे वळवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच ईस्टर्न फ्रीवेवरून येणारी काही वाहतूक देखील जे.जे. रोडकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. डी.एन. रोडवरील उत्तरेकडे जाणारी वाहतूक फॅशन स्ट्रीटमार्गे मेट्रो सिनेमा चौकाकडे वळवली जाईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना कमी त्रास व्हावा म्हणून पोलिसांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.