नगर जिह्यात सलग दुसऱया दिवशी अवकाळी पावसाचे थैमान

नगर जिह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. गुरुवारी रात्री पारनेर, नेवासा, राहुरी तालुक्याच्या काही भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामेही झाले; परंतु भरपाईची रक्कम शेतकऱयाच्या पदरात पडण्याआधीच निसर्गाने बळीराजाला पुन्हा झटका दिला आहे.

दोन दिवसांपूर्वीच नगर जिह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, राहुरीसह विळदघाट परिसरात गारांचा पाऊस झाला होता. त्यामध्येही मोठे नुकसान झाले होते. गुरुवारी (दि. 26) देवळाली प्रवरासह परिसरात रात्री नऊच्या दरम्यान सुसाट वाऱयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतामध्ये असलेली उभी पिके भुईसपाट झाली. शेतकऱयांची घडी पुन्हा बसविण्यास सुरुवात झाली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. येथील विटभट्टीचालक दत्तात्रय दळवी, बाबासाहेब दळवी, बंडू दळवी, राजेंद्र दळवी, यांनी मोठय़ा कच्च्या विटा तयार करून ठेवल्या होत्या. अवकाळी पावसाने या कच्च्या विटा पावसात विरघळल्या आहेत. यासह शेतात उभा असलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीतून शेतकरी कुठेतरी सावरण्यास लागला असताना पुन्हा निसर्गाने संकट उभे ठाकले आहे.