
शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी ओलांडून 33/11 केव्ही शिरदवाड उपकेंद्राला जोडणाऱया उच्चदाब विद्युत वाहिनीची उंची वाढविण्यासाठी महावितरणकडून टॉवर उभारण्यात आला आहे. पंचगंगेच्या काठावर 21 मीटर उंचीचे दोन टॉवर उभारल्याने महापुरात उच्चदाब विद्युतवाहिनी जलमय होण्याचा धोका टळला आहे. त्यामुळे शिरदवाड व परिसरातील आठ हजार ग्राहकांसाठी ही अखंडित प्रकाशाची ‘टॉवर-गुढी’ ठरली आहे.
महापुराच्या आपत्कालीनप्रसंगी जनजीवन सुरळीत राहावे, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यादृष्टीने शिरदवाड येथील ‘टॉवर-गुढी’ हा एक पायलट प्रकल्प आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कल्पकतेतून तो साकारला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून पंचगंगा काठावर 21 मीटर उंचीचे दोन टॉवर व आठ उच्चदाब वाहिनीचे वीजखांब उभारण्यात आले आहेत. टॉवरमुळे नदीपात्र ओलांडताना विद्युतवाहिनीची पात्रापासूनची उंची पूर्वीच्या तुलनेत 6 ते 7 मीटरने वाढली आहे.
2019मधील महापुरावेळी महापारेषणच्या 110 केव्ही इचलकरंजी उपकेंद्रातून 33/11 केव्ही शिरदवाड उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी उच्चदाब विद्युतवाहिनी पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सुमारे आठ हजारांहून अधिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा चार दिवस बाधित झाला होता. या टॉवरउभारणीमुळे आता पूर्वस्थिती उद्भवण्याचा धोका टळला आहे.