क्लासनची कसोटीतून निवृत्ती; आता फक्त वन डे, टी -20 क्रिकेटच खेळणार

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हेन्री क्लासनने टी-20 क्रिकेटसाठी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती दिल्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जातेय. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असलेल्या क्रिकेटपटूंची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे भीषण वास्तव समोर आलेय. लाल चेंडूच्या पारंपरिक कसोटीपेक्षा पांढऱया चेंडूची टी-20 क्रिकेट हीच नव्या क्रिकेटपटूंची पहिली पसंती ठरत असल्यामुळे सध्या कसोटी क्रिकेटलाच अग्निपरीक्षेला सामोर जावे लागत आहे. टी-20 चा पैसा कसोटी क्रिकेटला आणखी मोठे धक्के देणार असल्याचे क्रिकेट विश्वात खासगी बोलले जात आहे. या धक्क्यातून कसोटीला कसे सावरले जातेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या क्रिकेटमध्ये टी-20 क्रिकेटचीच चलती आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना कसोटी आणि वन-डे क्रिकेटबाबत फारसे आकर्षण नसल्याचे चित्र वारंवार उभे राहिले आहे. त्यातच जगभरात आयसीसीने 100 पेक्षा अधिक क्रिकेट लीगना हिरवा कंदील दिल्यामुळे कसोटीबरोबर वन-डे क्रिकेटची वाताहतही निश्चित मानली जात आहे. गेल्या चार वर्षांत केवळ 4 कसोटी खेळणाऱया क्लासनने आज आपण आपल्या आवडत्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले, पण तो टी-20 आणि वन डे क्रिकेट मात्र खेळणार आहे. क्लासन सध्या आयपीएल, द हंड्रेड, मेजर लीगची जोडला गेला आहे आणि तसेच आगामी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्येही तो खेळणार आहे.

निवृत्तीचा कठीण निर्णय – क्लासन
मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, हाच विचार माझ्या मनात रात्रभर येत होता. अखेर मी लाल चेंडूच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या हा निर्णय खूप कठीण होता. हा माझा आवडता फॉरमॅट होता. मी माझ्या कारकीर्दीबाबत समाधानी आहे. मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो, याचा मला आनंद आहे. माझी बॅगी कसोटी पॅप ही आतापर्यंतची बहुमूल्य कॅप आहे.

कसोटी क्रिकेटची ‘कसोटी’
गेल्याच आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेने आगामी दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये आपले महत्त्वाचे खेळाडू खेळावेत म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपला नवखा आणि दुय्यम संघ निवडला आहे. या संघात डेव्हिड बेडिंगहॅमचा अपवाद वगळता एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू नाही. तसेच वेस्ट इंडीजमध्येही टी-20 सामन्यांसाठी दिग्गज खेळाडू कसोटी क्रिकेटलाच दुय्यम वागणूक देत असल्याचे वारंवार समोर आलेय. गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेटसाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी आणि वन-डे क्रिकेटलाच गुडबाय केले आहे. हिंदुस्थानच्या उन्मुक्त चंद, हरमित सिंग, चैतन्य बिश्णोई, ताजिंदर सिंग, स्मित पटेल अशा युवा खेळाडूंनी मेजर लीगसाठी हिंदुस्थानी क्रिकेटलाच रामराम केले. तसेच दक्षिण आफ्रिकन, विंडीज आणि पाकिस्तानच्याही अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली आहे.