VIDEO: ऐकावं ते नवलच ! चार पायांची कोंबडी

44

सामना ऑनलाईन । पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील निगडीत चक्क चार पायांची कोंबडी आढळल्याने नागरिकांमध्ये कुतुहलाचा विषय बनला आहे. निगडीच्या तन्वीर चिकन शॉप मध्ये नेहमीप्रमाणे शंभर-सव्वाशे कोंबड्या चिकन विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी चिकन शॉप मालक कुदबुद्दीन होबळे यांला तेथील कामगाराने आपल्याकडे चार पायाची कोंबडी असल्याचे सांगितले. यावर सकाळी सकाळी चेष्टा करू नको, काम कर असं मालकाने सुनावले. मात्र कामगाराने लगेचच चार पाय असलेली कोंबडी समोर ठेवल्याने मालकही आश्चर्यचकीत झाला. बघता बघता चार पायांच्या कोंबडीची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि या कोंबडीला पाहण्यासाठी नागरिकांचा झुंबड उडाली.

दुकान मालक कुदबुद्दीन होबळे गेल्या तीस वर्षांपासून चिकन विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, पहिल्यांदाच चार पायांची कोंबडी पाहिल्याचे त्यांनी सांगितले. आता या चार पायाच्या कोंबडीला स्पेशल ट्रिटमेंट दिली जात आहे. तिच्यासाठी  पिंजऱ्यात वेगळी सोय करण्यात आली आहे. होबळे यांच्याकडे रोज अनेक कोंबड्या कापल्या जातात, मात्र चार पाय असल्यामुळे सध्यातरी ही कोंबडी हलाल होण्यापासून बचावली असून दुकानातील आकर्षण बनली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या