
विठ्ठलवाडी डेपोची सध्या दयनीय स्थिती झाली आहे. सर्वत्र चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना नाक मुठीत धरूनच यावे लागते. पिण्याच्या पाण्याची टाकी अक्षरशः भंगारमध्ये गेली असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेली आसन व्यवस्थादेखील मोडकळीस आली आहे. प्रसाधनगृहाची अवस्था तर भयंकर झाली आहे. प्रवाशांबरोबरच एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विठ्ठला.. विठ्ठलवाडी डेपोची अवस्था बघ रे बाबा.. असे साकडे घालण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
कल्याण पूर्वेत 16 एकरवर पसरलेल्या विठ्ठलवाडी एसटी आगारात 48 बसेस आहेत. आळेफाटा, अहिल्यानगर, कोकण, बुलढाणा मलकापूर, पंढरपूरसह राज्यभरात येथून बसेस धावतात. एसटी डेपोत चालक, वाहक, कार्यशाळा असे मिळून 250 कर्मचारी आहेत. विठ्ठलवाडी आगारातून दर दिवसाला 500 ते 600 प्रवासी वाहतूक होते. त्यातच आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पुलाचे काम सुरू असल्याने कल्याण एसटी डेपोचे कामकाज विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण आगारातील 60 ते 65 बसेस विठ्ठलवाडी आगारातून सोडल्या जातात. त्यामुळे दिवसभरात हजारो प्रवाशांची रेल चेल विठ्ठलवाडी आगारात असते.
प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काहीच सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणीही याठिकाणी नाही. शौचालयापर्यंत जाण्यासाठी चिखल तुडवत जावे लागते. फक्त 20 ते 25 प्रवाशांचीच आसन व्यवस्था असल्याने प्रवाशांना उभे राहून बसेसची प्रतीक्षा करावी लागते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही परिवहन विभागाकडून समस्यांची दखल घेतली जात नसल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.
विश्रांतीगृहाची दैना
कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रांतीगृहाची दैनाच उडाली आहे. या इमारतीच्या खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. विश्रांतीगृहातील स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. सफाईअभावी अस्वच्छता आहे. विश्रांतीगृहाच्या आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य असल्याने कर्मचाऱ्यांना नाकाला रुमाल लावून चालावे लागते.
१६ एकरवर पसरलेल्या विठ्ठलवाडी आगाराच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या एका सुरक्षारक्षकावर आहे.
आगारात प्रवेश करताच चिखलातून वाट काढत बसपर्यंत जावे लागते.
पाण्याच्या टाकीवर झाडे-झुडपे उगवली आहेत.