आदेशांचे पालन करण्यास टाळाटाळ, ठाणे महापालिका आयुक्तांना हायकोर्टाची अवमानाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

मानपाडा येथील सुमारे 100 एकर जागेच्या बदल्यात विकास हक्क प्रमाणपत्र किंवा टीडीआर देण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱया ठाणे महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संग्राम कनाडे यांच्याविरोधात अवमानाची नोटीस बजावत पुढील सुनावणी वेळी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

राज्य सरकारने 1975मध्ये डी. दाह्याभाई अँड पंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची 217 एकरपेक्षा जास्त जमीन वन उद्देशांसाठी ताब्यात घेण्याचे ठरविले. सरकारने 29 ऑगस्ट 1975 रोजी वन कायद्या अंतर्गत ही जमीन वन विभागाकडे सोपवली त्यातील मानपाडा परिसरातील 193 एकर जमिनीवरील दाव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकारचा या जमिनीवरील दावा फेटाळून लावला. दरम्यान ठाणे पालिकेला 25 फेब्रुवारीपासून 21 दिवसांच्या आत डीआरसी किंवा टीडीआर डी. दाह्याभाई अँड पंपनी प्रायव्हेट लिमिटेड पंपनीला देण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे पालन केले नाही म्हणून पंपनीने हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेत पालिकेला फटकारले. इतकेच नव्हे तर पालिका आपल्या भूमिकेपासून घुमजाव करू शकत नाही असे सुनावत न्यायालयाने या प्रकरणी पालिका आयुक्त सौरभ राव व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संग्राम कनाडे यांच्याविरोधात अवमानाची नोटीस बजावली.

पालिका प्रशासनाला अनेकदा याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेश पालनाबाबत पालिकेला उदारता दाखवण्यात आली आहे. आता मात्र अति झाले असून ठाणे महानगरपालिकेने हायकोर्टाच्या संयमाचा चुकीचा अर्थ घेतला आहे. त्यामुळे जबाबदार पालिका अधिकाऱयांवर अवमानाची कारवाई का करू नये.

– हायकोर्ट