
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पीडिता कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी आरोपीकडे तगादा लावत होती. आत्महत्या करून तुला गुह्यात अडकवेन, असे आरोपीला धमकावत होती, असे तूर्त तरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरोपीला 25 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला जात आहे, असे न्या. एन.आर. बोरकर यांच्या एकल पीठाने नमूद केले.
पुराव्यांशी छेडछाड करू नये. साक्षीदारांना प्रलोभन दाखवू नये, अशा अटी न्यायालयाने आरोपीला घातल्या आहेत. अटींचे उल्लंघन केल्यास हा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज करावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
वेदप्रकाश सिंग असे या आरोपीचे नाव आहे. पीडिता व सिंग एकाच कार्यालयात काम करायचे. लग्नाचे आमिष दाखवून सिंगने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरले होते. जातीमुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगत सिंगने मारहाण केली, असा पीडितेचा आरोप आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर सिंगने दुसऱ्या मुलीसोबत विवाह केला. याचा अर्थ माझी फसवणूक करण्याचा सिंगचा हेतू होता, असा दावा पीडितेने न्यायालयात केला.