
तरुणांना तुरुंगात डांबून ठेवणे धोक्याचे आहे. तरुण आरोपीला चांगला नागरिक बनण्याची संधी द्यायला हवी, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
तुरुंगात असलेल्या तरुणांना अनेक गैरवर्तनांना सामोरे जावे लागते. तरुणांमध्ये असमानतेची भावना निर्माण होते. त्यांचा समाजावर विश्वास राहत नाही. परिणामी तरुण आरोपींबाबत न्यायालयाने संयमाची भूमिका घ्यायला हवी, असेही न्या. मिलिंद जाधव यांनी नमूद केले. तरुण आरोपीला सुधारण्याची, सामाजिक एकात्मतेचा दृष्टिकोन ठेवून पुनर्वसनाची व सन्मानाने कमावण्याची संधी न्यायालयाने द्यायला हवी. तरुणाच्या जामिनावर सुनावणी करताना न्यायालयाने या गोष्टींचा विचार करायला हवा, असे न्या. जाधव यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण…
रितीक मिलिल असे या तरुण आरोपीचे नाव आहे. बलात्काराचा त्याचावर आरोप आहे. घरात कोणी नसताना रितीकने अत्याचार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. घटनेच्यावेळी पीडिता 14 वर्षांची होती, तर रितीक 20 वर्षांचा होता. 2023 मध्ये ही घटना घडली. पीडिता रितीकच्या घरातच वास्तव्यासाठी आली होती. पीडितेने रितीकच्या जामिनासाठी ना हरकत दिली. तरीही त्याला जामीन मंजूर का करावा, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. आरोपीचे वय बघता त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी, असे नमूद करत न्यायालयाने त्याला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.