जनावरांची सुटका करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला जामीन

रायगड येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका करणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यातील आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुरतुजा मेटकर असे या आरोपीचे नाव आहे. मेटकर शेतकरी आहे. त्याच्याविरोधात अन्य कोणत्याही गुह्याची नोंद नाही, असे नमूद करत न्या. एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने मेटकरला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

पोलिसांनी केला विरोध

मेटकरचा गुन्हा गंभीर आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप आहे. याचा तपास सुरू आहे. त्यामुळे मेटकरला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी पोलिसांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली नाही.

मार्च महिन्यात घडली घटना

खालापूर येथे गाय, बैलांची कत्तलीसाठी वाहतूक केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना 12 मार्च 2025 रोजी मिळाली. पोलिसांनी सापळा रचून एका टेम्पोची झडती घेतली. या टेम्पोत काही जनावरे होती. तेथे गोमांस होते. पोलिसांनी जनावरांची सुटका केली. ही जनावरे गोशाळेत नेत असताना पोलिसांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. या जमावात मेटकर होता. पोलिसांनी त्याला अटक केली. यात जामीन मिळावा यासाठी मेटकरने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.