
लोखंडी रॉडने मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मारहाणीची घटना पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध होत नाही किंबहुना अर्जदाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
31 ऑगस्ट रोजी तक्रारदार, त्याचा भाऊ व याचिकाकर्ता अजय यादव या तिघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी अजय यादव याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या आरोपावरून वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटक होऊ नये म्हणून आरोपी यादव याने अॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या घटनेप्रकरणी एकमेकांविरोधात एफआयआर दाखल असून प्राथमिकदृष्टय़ा ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसत नाही किंबहुना अर्जदाराविरुद्ध कोणतेही गुन्हेगारी रेका@र्ड नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.


























































