
मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल करून घबराटीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तो धमकीचा मेल करणाऱयाचा शोध घेत आहेत. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मुंबईत 34 ठिकाणी 34 मानवी बॉम्ब पेरून 400 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने स्पह्ट घडवून आणण्यात येणार असल्याची धमकी वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून देण्यात आली होती. परंतु गुन्हे शाखेने झटपट तपास करत हा धमकीचा संदेश पाठविणाऱया तरुणाला 24 तासांच्या आत पकडले होते. त्यानंतर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होत. या ई-मेलनंतर खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण इमारत तपासल्यानंतर धमकीचा खोटा ई-मेल असल्याचे निष्पन्न झाले.