लिफ्ट बंद? रहिवाशाची व्यवस्था हॉटेलमध्ये करा! हायकोर्टाचे गृहनिर्माण सोसायटीला आदेश

दुरुस्तीच्या कामासाठी गृहनिर्माण सोसायटीची लिफ्ट बंद राहणार आहे. हे काम होईपर्यंत गुडघ्याला दुखापत झालेल्या एका महिला रहिवाशाची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोसायटीला दिले आहेत. शायझा शेख असे या महिलेचे नाव आहे. मरोळ हिल ह्यू गृहनिर्माण सोसायटीतील पाचव्या मजल्यावर ही महिला तिच्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहते. दुरुस्तीच्या कामासाठी त्यांच्या इमारतीची लिफ्ट बंद राहणार आहे. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. मला नीट चालता येत नाही. अधिक वेळ उभे राहता येत नाही. मला पायऱ्या चढण्यास त्रास होतो. त्यामुळे लिफ्टचे काम होईपर्यंत सोसायटीने माझी व्यवस्था करावी, अशी मागणी करत शेख यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.

न्या. रियाझ छागला व न्या. फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लिफ्टचे काम होईपर्यंत शेख व त्यांच्या आई-वडिलांची जवळच्या एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाईल, अशी हमी सोसायटीने दिली. त्याची नोंद करून देत न्यायालयाने वरील आदेश दिले. लिफ्टच्या दुरुस्तीला उशीर झाल्यास तितके दिवस शेख व त्यांच्या आई-वडिलांची व्यवस्था हॉटेलमध्येच करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

जेवण, नाष्टा देण्याची मागणी

माझी व आई-वडिलांची जेवणाची व नाष्टय़ाची व्यवस्था करावी किंवा त्यासाठी काही रक्कम द्यावी, अशी मागणी शेख यांनी केली होती. त्यास न्यायालयाने नकार दिला.

लिफ्टच्या कामाला परवानगी

लिफ्टच्या दुरुस्ती कामाला न्यायालयाने सोसायटीला परवानगी दिली. हे काम 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून सात ते आठ दिवसांत पूर्ण होईल, असे सोसायटीने स्पष्ट केले.