
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) अभ्यासक्रमाचे सहा सेमिस्टर यशस्वीरीत्या पूर्ण करूनही पदवी पूर्ण झाल्यावर एका विद्यार्थ्याला अपात्र ठरवून त्याचा निकाल आणि पदवी प्रमाणपत्र रोखून धरणाऱया मुंबई विद्यापीठाचा हायकोर्टाने चांगलाच समाचार घेतला. विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्याला नको, असे फटकारत हायकोर्टाने 15 दिवसांत बीएमएसचा निकाल विद्यार्थ्याला देण्याचा आदेश हायकोर्टाने दिले.
मुंबई विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार बीएमएस प्रवेशासाठी विद्यार्थ्याने 12 वीची परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. याचिकाकर्ता 12 वीमध्ये गणिताच्या विषयात नापास झाला होता आणि त्यानंतर त्याने ‘कंपार्टमेंट’ परीक्षेत तो विषय उत्तीर्ण केला. विद्यापीठाच्या मते, हा ‘दुसरा प्रयत्न’ असल्याने त्याला अपात्र करण्यात आले. याप्रकरणी चिराग डुंगरशी या विद्यार्थ्याने ऍड. जयेंद्र खैरनार यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. जर तो अपात्र होता तर त्याला सुरुवातीलाच प्रवेश नाकारायला हवा होता, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले.
न्यायालयाचे निरीक्षण
- याचिकाकर्त्याने प्रवेश घेताना (2022-23 मध्ये) आपली सर्व कागदपत्रे, ज्यात तो ‘कंपार्टमेंट’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट होते ती सादर केली होती.
- अलकेश दिनेश मोदी इन्स्टिटय़ूट फॉर फायनान्शियल ऍण्ड मॅनेजमेंट स्टडीज व विद्यापीठाने तीन वर्षे विद्यार्थ्याच्या पात्रतेवर कोणताही आक्षेप घेतला नाही. पदवी पूर्ण झाल्यावर त्याला अपात्र ठरवले. विद्यापीठाचे हे कृत्य अन्यायकारक आहे.



























































