ही भाषा गटाराची! कुरेशींबद्दलच्या विधानावरून हायकोर्टाने भाजप मंत्र्याला फटकारले

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप नेते, मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. शाह यांनी वापरलेली भाषा गटाराची आहे. त्यांचे वक्तव्य अश्लाघ्य आहे, असे ताशेरे ओढतानाच त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक वेळा ब्रिफिंग केले. या ब्रिफिंगमुळे देशभरात सर्वत्र कर्नल कुरेशी यांचे काwतुक झाले. मात्र दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भाजप नेते, मंत्री विजय शाह यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्नल कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण असे संबोधले होते. यामुळे शाह यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. काँग्रेस पक्षाने शाह यांची मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी केली.