भगवद्गीता धार्मिक नाही! मद्रास हायकोर्टाने नोंदवले निरीक्षण

‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून नैतिक शास्त्र आहे. हा ग्रंथ हिंदुस्थानच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधता येणार नाही,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवले आहे.

‘आर्ष विद्या परंपरा’ नामक ट्रस्टने विदेशी निधी मिळवण्याच्या उद्देशाने एफसीआरए अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज केला होता, मात्र ही संस्था धार्मिक असून तिने आधीच परवानगीशिवाय विदेशी निधी घेतल्याचे सांगत हा अर्ज केंद्राने फेटाळला. त्यास ट्रस्टने आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्या. जी. आर. स्वामिनाथन यांनी केंद्राला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले. भगवद्गीता शिकवल्याने कोणताही ट्रस्ट ‘धार्मिक’ होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

योगा आणि वेदांत हे धर्मनिरपेक्ष

योगासने आणि वेदांतावरही न्यायालयाने भाष्य केले. ‘योग आणि वेदांताच्या शिक्षणाकडे संकुचित धार्मिक भिंगातून पाहू नये. योग हा शारीरिक आणि मानसिक कल्याणाचा मार्ग आहे. ती एक धर्मनिरपेक्ष अनुभूती आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.