
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलन, ढगफुटी आणि पूर यामुळे मोठं नुकसान झालं आहे. यातच हिमाचल प्रदेशाला अधिकृतपणे ‘आपत्तीग्रस्त राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सोमवारी विधानसभेत केली. या घोषणेमुळे राज्याला केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यापासून हिमाचल प्रदेशात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने राज्याला हादरवून सोडले आहे. २१ ऑगस्टपासून पुन्हा सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे चंबा, कुल्लू, लाहुल स्पीती, मंडी, शिमला, कांगडा आणि हमीरपूर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि इतर हवामानाशी संबंधित घटनांमुळे १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच पावसाशी संबंधित आणि रस्ता अपघातांसह ३२० लोकांचा जीव गेला आहे. यातच आज हिमाचल प्रदेशाला अधिकृतपणे ‘आपत्तीग्रस्त राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.