लग्नासाठी तरुणींचे किमान वय किती असावे? नव्याने ठरवण्यासाठी समितीचे गठन

1451

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर 7 व्यांदा तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांचे सरकार काय नवे निर्णय, योजना आणणार आहेत याबाबतही भाष्य केले. या भाषणात त्यांनी लग्नासाठी तरुणींचे किमान वय किती असावे हे नव्याने ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले असून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले.

1929 साली शारदा कायदा लागू करण्यात आला होता, त्यावेळी मुलींच्या लग्नासाठीची वयोमर्यादा 15 असेल असेल जाहीर करण्यात आले होते. या कायद्यामध्ये 1978मध्ये सुधारणा करण्यात आली आणि, लग्नासाठी तरुणींचे किमान वय नव्याने ठरवण्यात आले. सध्याच्या घडीला देशात तरुणींसाठी लग्नाची किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे तर तरुणांसाठी 21 वर्ष निर्धारीत करण्यात आली आहे.

शिक्षण, आरोग्य यावर आपले सरकार अधिक जोर देत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी नारीशक्तीचा गौरव केला. पंतप्रधान म्हणाले की महिलांना जेव्हा जेव्हा संधी देण्यात आली तेव्हा त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम केले, देशाला मजबूती प्रदान करण्यास मदत केली. महिला आज भूगर्भात कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत तर दुसरीकडे लढाऊ विमानांमध्ये सवार होत आकाशाला गवसणीही घालत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या