
‘हिंदुस्थान हा देश आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. तशी घोषणा करण्याची गरज नाही,’ असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मांडले.
अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत योगदान देणाऱया मान्यवरांचा सोमवारी नागपुरात सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. ’हिंदुस्थान हे एक हिंदू राष्ट्र आहे असे म्हटल्यावर पूर्वी लोक हसायचे. अयोध्येत मंदिर उभे राहिल्यानंतर हे चित्र बदलले. आज तेच लोक हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगतात आणि देश हिंदू राष्ट्र असल्याची घोषणा करा असे म्हणतात. मात्र त्याची काही गरज नाही, असे भागवत म्हणाले.
‘दुसरा कोणताही देश हिंदुस्थानसाठी उभा राहणार नाही. हिंदुस्थान स्वतःच्या क्षमतेवर प्रगती करेल आणि जगाला वाचवेल,’ असेही भागवत म्हणाले.



























































