Movie Review- इतिहासातल्या हिरेची कहाणी

1065

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

शाळेतल्या पुस्तकातून आपल्याला हिरकणीची पहिली ओळख झाली होती. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत आपल्या बाळासाठी जिवावर उदार होऊन अखंड कडा उतरून जाणाऱया पराक्रमी हिरकणीबद्दल ठाऊक नाही असं महाराष्ट्रात क्वचितच कोणी तरी सापडेल आणि जेव्हा त्याच हिरकणीवर सिनेमा येतोय हे कळताच सिनेमा रसिकांची आणि इतिहासप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्या प्रमाणे प्रदर्शित झालेल्या हिरकणी सिनेमाने प्रभावित केलं असलं तरीही जो थरार पडद्यावर बघायला मिळेल असं वाटलं होतं त्या बाबतीत मात्र निराशाच झाली.

हिरकणी सिनेमाची कथा रायगडाच्या पायथ्याशी असणाऱया हिरकणीच्या छोटय़ाशा कुटुंबाभोवती आणि महाराजांच्या ठायी असणाऱ्या तिच्या निष्ठेभोवती फिरते. गड उतरून गेलेल्या हिरकणीची गोष्ट आपल्याला ठाऊक असली तरी तिचं आयुष्य कसं होतं, तिच्या कुटुंबात कोण होतं, तिच्या आशा आकांक्षा आणि इतर सगळ्या गोष्टीला हा सिनेमा उलगडतो. त्यामुळे फक्त हिरकणीची कोजागरीच्या रात्रीची गोष्ट समोर न येता तिचं अखंड आयुष्य आपल्या समोर उलगडत. बहुतांश ते आपल्याला ठाऊक नसल्याने आपण त्यात रंगत जातो… आणि मग त्या पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार आणि प्रत्यक्ष जो थरार ऐकून आहोत तो कसा असेल याबद्दल उत्सुकता अधिक वाढते. हा थरार कसा उभा केला गेला आहे, हिरकणीचं आपण ऐकून असलेलं साहस नेमकं कसं होतं हे या सिनेमातून आपल्या समोर येतं.

पण सिनेमाचा थोडा गोंधळ इथेच झाला आहे. म्हणजे पहिल्या अर्ध्या भागात जो सिनेमा घडतो त्यात हिराचा छोटासा प्रेमाचा संसार, त्यातल्या हळुवार गोष्टी, महाराजांच्या मावळ्यांच्या घरचं वातावरण, महाराजांवरील निष्ठा, रायगडावरील भव्यता या गोष्टी इतक्या छान उभ्या केल्या आहेत की त्या पाहताना आपण त्यात रंगून जातो. मध्यांतर संपताना गडाचे दरवाजे बंद होतात. आता पश्चिम कडा असे शब्द येतात आणि मध्यांतर होतो. त्यामुळे मध्यांतरानंतर खूपच कमाल नाटय़ पाहायला मिळेल असं वाटू लागतं, पण दुर्दैवाने प्रेक्षकांच्या या अपेक्षा अर्धवटच राहतात. ती खाली उतरत असताना कडय़ावरचा थरार हा कुठेतरी त्रोटक झालाय असं वाटतं. तब्बल तीन वेळा ती कडय़ावरून सरळ खाली पडते आणि कुठेतरी अडकते, पण त्यात श्वास रोखून धरायला लावणारा थरार जाणवतच नाही. साप, लांडगा, वटवाघूळ, मधमाश्या यांना ती सामोरं जाते खरं, पण ही सगळी दृश्य खरी नसल्याचं चटकन जाणवतं. जेव्हा कडा खाली खूप असतो तेव्हा नंतरच्या पल्ला ती चटकन उतरून जाते तो कसा जाते हेदेखील दाखवलं गेलं नाही. त्यामुळे खऱया नाटय़ाच्या वेळी सिनेमा चटकन उरकला जातो आणि आपण वाचलेल्या हिरकणीचं धाडस मनापासून अनुभवता आलं नाही याची खंत प्रेक्षकाला लागून राहते.

अभिनय उत्तम झालाय. सोनाली कुलकर्णीने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. बाकी सगळ्या कलाकारांनीही छान काम केलं आहे. प्रसाद शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसतो. तर हिरकणीच्या धाडशी नवऱयाच्या भूमिकेत अभिनेता अमित खेडेकरदेखील चपखल बसला आहे. सिनेमाचं लिखाण दिग्दर्शन चांगलं झालं असलं तरी तो थरार आणखी प्रभावी ठरू शकला असता असं मात्र राहून राहून वाटतं. छायांकन उत्तम झालं आहे. नृत्य दिग्दर्शन देखणं. तसंच सिनेमाचा काळदेखील छानच उभा राहिला आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या वेळेस जो पोवाडा आहे तो ऐकताना खरोखरच आपण त्या काळातला त्याचा आभास होतो. त्यातला रांगडेपणा, रयतेच महाराजांवरचं प्रेम, राज्याभिषेकाच्या दिनाचा रयतेत असणारा आनंद हे सगळं उत्तम उभं राहीलं आहे.

एकूणच इतिहासाचं आणखीन एक पान उलगडणारा हिरकणी हा सिनेमा देखणा आहे, महत्त्वाचादेखील आहे. कदाचित नाटय़मय दृश्य अधिक खुलली तर या सिनेमाची मजा अधिक बहरली असती यात शंका नाही.

  • सिनेमा-हिरकणी
  • दर्जा- अडीच स्टार
  • निर्माता-इरादा एन्टरटेन्मेंट आणि   राजेश मापुस्कर
  • दिग्दर्शक-प्रसाद ओक
  • कथा-प्रताप गंगावणे
  • पटकथा, संवाद-चिन्मय मांडलेकर
  • छायांकन-संजय मेमाणे
  • कलाकार-सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, विमल म्हात्रे, मेहुल, प्रसाद ओक
आपली प्रतिक्रिया द्या